मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला

मुंबई: पक्षाच्या पहिल्याच अधिवेशनात नवा झेंडा देऊन पक्षाला प्रखर हिंदुत्वाची नवी दिशा देऊ पाहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आजचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. तब्येतीच्या कारणावरून हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली. पक्षाच्या पहिल्या अधिवेशनानंतर राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर राज ठाकरे यांनी आखलेला मराठवाडा दौरा महत्त्वाचा मानला जातो. मनसेला मराठवाड्यात आपला जनाधार वाढवण्याची आवश्यकता असल्याने मनसेने मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला तुलनेने चांगले यश मिळत आले आहे. आपल्या अधिवेशनात प्रखर हिंदुत्वाची कास धरल्यानंतर मनसेने मराठवाड्याकडे लक्ष केंद्रीत करणे हे पक्षाच्या भविष्यातील वाटचाल कशी असेल याचे संकेत देणारी आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर येथे आयोजित कृषी नवनिर्माण २०२० चं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार होते.