महाविकास आघाडीत धुसफूस

मुंबईः राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आली असताना आता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या हायकमांड सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान काँग्रेसकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाने निवडणुकांच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी भर दिला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही वचननाम्यात दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात करावी, असे मिलिंद देवरा यांनी सोनियांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. महाविकास आघाडी राज्यात चांगले काम करीत आहे. मात्र काँग्रेसकडून आश्वासनांची पूर्तता लवकर करण्यात यावी. केंद्रात काँग्रेसची सत्ता न आल्यामुळे लोकसभेला दिलेल्या आश्वासनाला ब्रेक लागला होता. परंतु राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसचा सहभाग असल्याने या आश्वासनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे, असे मिलिंद देवरा यांचे म्हणने आहे.